सांबा मॅजिकसाठी फुटबॉलनगरी आतुर
बॅडपॅचमधून सचिन काहीसा बाहेर पडल्याने मिळालेला दिलासा , पाहुण्यांनी खंबीरपणे बॅटिंग केल्याने झालेला हिरमोड ...
... क्रिकेटच्या मैदानावरून फुटबॉलवेड्या कोलकातावासीयांचे लक्ष आता सॉल्ट लेक मैदानाकडे लागले आहे . आणि त्याला कारणही तेवढेच भरभक्क आहे . ते म्हणजे ब्राझीलच्या 1994 सालच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा शनिवारी होणारा सामना .
पेलेच्या धमाकेदार खेळाने ब्राझीलने 1970 साली वर्ल्डकपचे तिसरे विक्रमी विजेतेपद पटकावले होते . त्यानंतर विश्वविजेतेपदाच्या प्रतीक्षेत दोन तपाचा कालावधी लोटला होता . डुंगा याच्या नेतृत्त्वाखाली ब्राझीलने अमेरिकेतील स्पर्धेत विक्रमी चौथे विजेतेपद पटकावले . केवळ ब्राझीलच नव्हे , तर जगभरातील फुटबॉलरसिकांनी हा जल्लोष साजरा केला . म्हणूनच , 94 सालच्या विजेतेपदाला ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासामध्ये अनन्यसाधारण
महत्त्व आहे . आणि हेच विजेतेपद साकारणारा संघ शनिवारी सांबा मॅजिक
दाखविणार आहे .
ब्राझीलच्या संघाविरुद्ध पश्चिम बंगाल क्रीडामंत्री इलेव्हन हा संघ खेळणार आहे . त्यामध्ये कोलंबियाचा स्कॉर्पिओ किंग म्हणून प्रसिद्ध असलेला गोलकीपर रेने हेगुइटा हा प्रमुख आकर्षण असेल , भारताच्या फुटबॉलनगरीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची पावले लगेचच सॉल्ट लेक स्टेडियमकडे वळली . चाहत्यांना अभिवादन करून त्याने थोडा वेळ सरावही केला . पन्नाशीकडे झुकलेला हेगुइटा अजूनही मैदानावर तेवढाच उत्साही दिसतो . ब्राझीलचा सर्व संघ उद्या , शुक्रवारी कोलकात्यामध्ये येईल .
ब्राझीलपासूनचा मोठा प्रवास तो दोन टप्प्यात करणार आहे . त्यामुळेच , त्यांना फारशी थकावट जाणवणार नाही . कोलकात्यात चेक - इन झाल्यानंतर लगेचच , दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा संघ सॉल्ट लेकवर सराव करेल . त्यानंतर अनाथ विद्यार्थ्यांच्या काही शाळांना भेटी देईल . तेथून मदर तेरेसा यांच्या आश्रमात जाऊन अभिवादन करेल . या संघाच्या सन्मानार्थ रात्री खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . त्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बंगालमधील व्हीव्हीआयपी , पेज थ्री दिग्गजांची उपस्थिती असेल . याच व्यग्र शेड्युलमध्ये या संघातील काही प्रमुख खेळाडू माध्यमांशी
संवादही साधण्याचा प्रयत्न करतील .
शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून सांबा मॅजिकला प्रारंभ होईल . काही मनोरंजनात्मक कार्यक्रमांनंतर चार वाजण्याच्या सुमारास ब्राझीलचा सामना सुरू होईल , अशी माहिती संयोजकांनी दिली .
पेलेपुत्राचे आकर्षण ...
ब्राझीलच्या या सामन्यासाठी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून साक्षात पेले उपिस्थत राहणार होता . पण , त्याच्या पाठीवर मोठी शस्रक्रिया झाली आहे . त्यामधून तो रिकव्हर होत आहे . संयोजकांनी गेल्या महिन्यात पेलेची ब्राझीलला जाऊन भेट घेतली होती . त्या वेळी पेले कोलकात्यामध्ये तब्बल 35 वर्षांनंतर परतण्यास उत्सुक होता . पण , वैद्यकीय सल्ल्यावरच सर्व अवलंबून आहे , असे त्याने स्पष्ट केले होते . दरम्यान , पेलेचा मुलगा एडिन्हो हाच आता शनिवारच्या सामन्याचे आकर्षण ठरणार आहे .
No comments:
Post a Comment