Saturday, 1 December 2012

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक

अभय चौटाला ऑलिम्पिक संघटनेचे नवे अध्यक्ष वादग्रस्त ललित भानोत सरचिटणीसपदी


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या तंबी सत्रानंतर अध्यक्षपदाचे उमेदवार रणधीरसिंग यांनी आपला अर्ज परत घेत नामांकन रद्द केले. यानंतर अध्यक्षपदाच्या रिंगणात एकमेव उमेदवार राहिलेले अभयसिंग चौटाला यांना हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष घोषित करण्यात आले. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेले ललित भानोत हे सरचिटणीसपदी विराजमान झाले.
५ डिसेंबर रोजी हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक होणार होती. या निवडणुकीत बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अभयसिंग चौटाला आणि रणधीरसिंग यांनी अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेला आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्र पाठवले होते. ५ डिसेंबर रोजी होणारी निवडणूक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या संहितेप्रमाणेच व्हायला हवी. असे न झाल्यास हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेची मान्यताच रद्द करणार असल्याचे अध्यक्ष जॅक रोगे यांनी सांगितले होते. हे पत्र धडकताच मात्र रणधीरसिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अभयसिंग चौटाला ही एकमेव व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक होती. अर्ज परत घेण्याची तारीख संपल्यानंतर अभयसिंग चौटाला यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली.
तुरुंगाची हवा खाल्लेले भानोत
ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत ललित भानोत या वादग्रस्त व्यक्तीची हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाली. राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळांदरम्यान हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात प्रमुख आरोपी कॉंग्रेस खासदार सुरेश कलमाडींसह भानोत देखील तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. हिंदुस्थानी क्रीडा संहितेप्रमाणे कलमाडी यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नव्हती. यामुळे आपला ‘राईट हॅण्ड’ असलेल्या ललित भानोतला कलमाडींनी निवडणुकीत उतरवले होते.
लुसानला पथक पाठवणार- चौटाला
हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक नियमाप्रमाणे न झाल्यास संघटनेची मान्यताच रद्द करणार असल्याची धमकी आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेली आहे. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे झालेली नाही. मात्र लुसान येथील मुख्यालयात दोन सदस्यांचे पथक पाठविले जाणार आहे. हे पथक वरिष्ठांशी चर्चा करून तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अभयसिंग चौटाला यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment